1958 मध्ये माणगाव खो-यातील शैक्षणिक गरज लक्षात घेऊन कै. दाजी ओळकर, कै. भिकाजी (स्वामी) पाडगांवकर, कै.वि.पां.माणगांवकर आदि शिक्षण प्रेमी मंडळींनी एकत्र येऊन ‘माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगाव’ या नावाने माणगाव येथे ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला कै. विठ्ठल नारायण काणेकर यांच्या जागेत ‘युनियन इंग्लिश स्कूल’ या नावाने 1959 मध्ये हायस्कूल सुरू झाले. इ. 8 वी पासून सुरु झालेली ही शाळा उत्तरोत्तर प्रगती करीत 11वी (जुनी) पर्यंत पाहोचली. दरम्यान तांबळवाडी येथे स्वत:च्या वास्तू उभ्या राहिल्या.
माणगाव येथे जन्म घेऊन गृहास्थाश्रमानंतरचे सर्व आयुष्य नरसोबावाडी, गाणगापूर, गुजरात येथे जास्त प्रमाणात व संपूर्ण देशभर चातुर्मास करून लोकोद्धार, आध्यात्मिक वाड्.मय निर्माण करणारे थोर दत्त संप्रदायी प.पू.श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे चिरकाल स्मरण रहावे म्हणून 1971 मध्ये या ’युनियन इंग्लिश स्कूल’ चे नामाभिधान ’श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव’ असे करण्यात आले. पूज्य स्वामींच्या आशीर्वादाने शाळेची प्रगती उत्तरोत्तर होतच गेली. आज या शाळेत 1660 मुले 5वी ते 12वी पर्यंतच्या 34 तुकड्यांमधून शिकत आहेत. त्यासाठी 58 शिक्षक व अन्य 20 असा 78 कर्मचारी वर्ग आहे.
शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 1975 मध्ये ज्युनिअर कॉलेज (कनिष्ठ माध्यमिक विद्यालय) सुरू झाले. प्रथम वाणिज्य, नंतर कला, विज्ञान व 1991 पासून व्यावसायिक अभ्यासक्रम अकौंटिंग ऑडिटिंग, घरगुती विद्युत उपकरणे निगा व दुरुस्ती, सातत्याने 90 टक्के वर निकाल, सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी प्रशिक्षित कष्टाळू व प्रत्येक विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवणारा शिक्षकवर्ग, विस्तीर्ण 400 मीटर क्रीडांगण, शैक्षणिक साधनांची परीपूर्ती, आकर्षक इमारती, शिस्त, संगणक कक्ष, व्यायामशाळा, शाळेय वस्तु भांडार, शालेय उपहारगृह, पुस्तकपेढी, ग्रंथालय अभ्यासिका 5 वी ते 12 वी संगणक शिक्षण या उच्च माध्यमिक विद्यालयाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. कच्चे विद्यार्थी या शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आज उच्च व्यावसायिक बनले आहेत.
2007-2008 या शैक्षणिक वर्षी शासनमान्य कला महाविद्यालयाची (कायम विनाअनुदानीत) सुरूवात करण्यात आली. आज या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य तथा कंप्यूटर सायन्य आदि विविध शाखा सुव्यवस्थितपणे चालू आहेत.
नियोजित: शासनमान्य विधी महाविद्यालय लवकरच सुरू करण्यासाठी संस्थेचे अथक परिश्रम सुरू आहेत. माणगाव खोरे व जिल्हा यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी सुरू आहे.