Monday, January 17, 2011

माननीय अध्यक्ष श्री सगुणजी साबाजी धुरी जी का मंतव्य

श्री सगुणजी साबाजी धुरी
श्री सगुणजी साबाजी धुरी (अध्यक्ष)
अध्‍यक्ष
माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगाव
व माजी वित्त बांधकाम सभापती जि.प. सिंधुदुर्ग

      माणगांवातील शिक्षणप्रेमी, शिक्षणाबद्दल आस्‍था, प्रेम आणि काळाची गरज ओळखून माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची निर्मिती केली. तदवत माणगांवातील दानशूर व्‍यक्‍तींनी विनामोबदला मंडळाला आपली मौल्‍यवान अशी जागा देऊन उपकृत केले आणि त्‍यामुळेच हे शिक्षण प्रसारक मंडळ, माणगांव सारख्‍या डोंगराळ, दुर्गम भागात उच्‍च शिक्षणाच्‍या सुविधा निर्माण करू शकले. त्‍याबद्दल मी अशा कर्ता आणि करवित्‍या सर्व मंडळींचे प्रथमत: नम्रपणे आभार व्‍यक्‍त करतो.

      या प्रशालेचा मी माजी विद्यार्थी. या प्रशालेमुळेच मी पदवी पर्यंत उच्‍च शिक्षण घेऊ शकलो, मान-सन्‍मान, प्रतिष्‍ठा मला या प्रशाले मुळे आणि माझे गुरूवर्य कै. मोहन द. रांगणेकर यांच्‍या मुळे मिळाले. शिक्षण संस्‍था म्‍हणजे ज्ञान व व्‍यक्तिमत्‍व विकासाला प्रेरणा देणारे एक स्‍थान, जीवनाला शिस्‍त, संस्‍कार, गती आणि सर्वांग सुंदर जीवन तयार करणारे एक महत्‍वपूर्ण साधन. विद्यार्थी शिक्षणाच्‍या माध्‍यमातून आत्‍मनिर्भर बनतो. वाचन आणि लेखनातून संस्‍कारक्षम पिढी निर्माण होत असते. माझे सर्व संचालक, सहकारी आणि असंख्‍य सभासदांच्‍या सहकार्यातून माणगांव सारख्‍या दुर्गम आणि डोंगराळ भागात उच्‍च शिक्षणाच्‍या पायाभूत आणि मुलभूत, भौतिक सुविधा निर्माण केल्‍याचा आणि उच्‍च शिक्षणापासून ग्रामीण भागातील मुले वंचित राहू नये याबद्दल प्रामाणिक प्रयत्‍न केल्‍याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

      शिक्षण प्रसारक मंडळाचा सभासद, संचालक, पदाधिकारी म्‍हणजे खुर्ची भुषविण्‍याचे स्‍थान नाही ही गोष्‍ट आपण प्रथम लक्षात घेणे आवश्‍यक आहे. सामाजिक मूल्‍यांची जाणीव ठेऊन जनकल्‍याणासाठी स्‍वीकारण्याची मनोधारणा, इच्‍छाशक्‍ती आवश्‍यक आहे आणि त्‍यामुळे सामाजिक बांधिलकी मानून नि:स्‍वार्थ बुद्धीनी संचालकाचे आणि संस्‍थेचे पदाधिकारी म्‍हणून कर्तव्‍य पार पाडण्‍याची जबाबदारी विश्‍वस्‍तांवर येऊन पडते आणि म्‍हणून मुंबई सार्व‍जनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 व मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था उपविधी 1951 करताना शासनाने धर्मदाय खात्‍यातील अधिका-यांना जसे विशिष्‍ट अधिकार दिले आहेत. त्‍याप्रमाणे विश्‍वस्‍तांची कार्ये व कर्तव्‍ये आहेत. त्‍यांना काही अधिकार आहेत. त्‍यासंबंधी तरतुदी केल्‍या आहेत. त्‍या तरतुदीचे पालन करून संस्‍थेचा कारभार विश्‍वस्‍तांना चालवावा लागतो. संस्‍था ती खाजगी असो किंवा सार्वजनिक असो ती कोणत्‍याही बेकायदेशीर, अवैध अथवा अनैतिक कामासाठी स्थापन करता येत नाही. अशा संस्‍थेस वैधता प्राप्‍त होत नाही आणि म्‍हणून सर्व सम्‍माननीय समासदांनी दिलेली खुर्ची ही मान-सन्‍मान आणि प्रतिष्‍ठेची नसून सर्व सामान्‍यांची सेवा करण्‍याची एक सुवर्णसंधी आहे. अशी माझी मनस्‍वी धारणा आहे.

      माध्‍यमिक, उच्‍चमाध्‍यमिक आणि महाविद्यालयात अध्‍यापन करणा-या सर्व शिक्षक वर्गाचे आद्य कर्तव्‍य ठरते की, आपल्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींना दर्जेदार गुणवत्‍ता प्रधान, टिकाऊ, संस्‍कारक्षम, व्‍यक्तिमत्‍व विकासाला वाव देणारे, शिस्‍तप्रिय शिक्षण देणे. समाजामध्‍ये होणारे बदल आणि घडणा-या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक बदलाचा परिणाम विद्यार्थी वर्गावर होत असतो. देशातील वाढती लोकसंख्‍या, शासनाची नव-नवीन धोरणे, भ्रष्‍टाचार, शिक्षणाच्‍या बदलत्‍या पद्धती यांचे दुष्‍परिणाम आजच्‍या विद्यार्थी वर्गावर होत आहेत. आणि म्‍हणून शैक्षणिक क्षेत्रात अध्‍यापन करणा-या शिक्षकांची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची आहे.

      शासनाने शैक्षणिक संस्‍थांना मिळणारी सर्व प्रकारची अनुदाने सन 2004 पासून बंद केलेली आहेत. महाराष्‍ट्र शासनाचा शिक्षण विभागाकडे बघण्‍याचा दृष्टिकोन उदासिनतेचा आहे. त्‍यामुळे शैक्षणिक उपक्रम आणि शैक्षणिक सुविधा निर्माण करण्‍याची जबाबदारी आपणा सर्व सभासदांवर, देणगीदारांवर येऊन पडलेली आहे. शिक्षणाच्‍या पवित्र कार्यात एकमेका सहाय्य करूं, अवघे धरू सुपंथ या उक्तिनुसार आता आपणा सर्वांना मिळून कार्य करण्‍याची गरज आहे. त्‍यातूनच आपण या संस्‍थेचा उत्‍कर्ष व विकास साधू शकतो. म्‍हणूनच मी आज या प्रसंगी आपना सर्वांना नम्र आवाहन करतो की, आपण सर्वांनी सहकार्य करावे. एवढेच बोलून मी माझे चार शब्‍द संपवितो.

                                                        धन्‍यवाद।
       

Sunday, January 16, 2011

माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगाव


             1958 मध्‍ये माणगाव खो-यातील शैक्षणिक गरज लक्षात घेऊन कै. दाजी ओळकर, कै. भिकाजी (स्‍वामी) पाडगांवकर, कै.वि.पां.माणगांवकर आदि शिक्षण प्रेमी मंडळींनी एकत्र येऊनमाणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगावया नावाने माणगाव येथे ही संस्‍था स्‍थापन केली. सुरुवातीला कै. विठ्ठल नारायण काणेकर यांच्‍या जागेतयुनियन इंग्लिश स्‍कूलया नावाने 1959 मध्‍ये हायस्‍कूल सुरू झाले. . 8 वी पासून सुरु झालेली ही शाळा उत्तरोत्तर प्रगती करीत 11वी (जुनी) पर्यंत पाहोचली. दरम्‍यान तांबळवाडी येथे स्‍वत:च्‍या वास्‍तू उभ्‍या राहिल्‍या.
           
            माणगाव येथे जन्‍म घेऊन गृहास्‍थाश्रमानंतरचे सर्व आयुष्‍य नरसोबावाडी, गाणगापूर, गुजरात येथे जास्‍त प्रमाणात संपूर्ण देशभर चातुर्मास करून लोकोद्धार, आध्‍यात्मिक वाड्.मय निर्माण करणारे थोर दत्त संप्रदायी .पू.श्री. वासुदेवानंद सरस्‍वती (टेंबे स्‍वामी) यांचे चिरकाल स्‍मरण रहावे म्‍हणून 1971 मध्‍ये यायुनियन इंग्लिश स्‍कूलचे नामाभिधान  ’श्री वासुदेवानंद सरस्‍वती विद्यालय, माणगावअसे करण्‍यात आले. पूज्‍य स्‍वामींच्‍या आशीर्वादाने शाळेची प्रगती उत्तरोत्तर होतच गेली. आज या शाळेत 1660 मुले 5वी ते 12वी पर्यंतच्‍या 34 तुकड्यांमधून शिकत आहेत. त्‍यासाठी 58 शिक्षक अन्‍य 20 असा 78 कर्मचारी वर्ग आहे.
           
            शासनाच्‍या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 1975 मध्‍ये ज्‍युनिअर कॉलेज (कनिष्‍ठ माध्‍यमिक विद्यालय) सुरू झाले. प्रथम वाणिज्‍य, नंतर कला, विज्ञान 1991 पासून व्‍यावसायिक अभ्‍यासक्रम अकौंटिंग ऑडिटिंग, घरगुती विद्युत उपकरणे निगा दुरुस्‍ती, सातत्‍याने 90 टक्‍के वर निकाल, सुसज्‍ज प्रयोगशाळा, अनुभवी प्रशिक्षित कष्‍टाळू प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांशी संपर्क ठेवणारा शिक्षकवर्ग, विस्‍तीर्ण 400 मीटर क्रीडांगण, शैक्षणिक साधनांची परीपूर्ती, आकर्षक इमारती, शिस्‍त, संगणक कक्ष, व्‍यायामशाळा, शाळेय वस्‍तु भांडार, शालेय उपहारगृह, पुस्‍तकपेढी, ग्रंथालय अभ्‍यासिका 5 वी ते 12 वी संगणक शिक्षण या उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाची वैशिष्‍ट्ये ठरली आहेत. कच्‍चे विद्यार्थी या शाळेत चांगल्‍या गुणांनी उत्तीर्ण होऊन आज उच्‍च व्‍यावसायिक बनले आहेत.
           
            2007-2008 या शैक्षणिक वर्षी शासनमान्‍य कला महाविद्यालयाची (कायम विनाअनुदानीत) सुरूवात करण्‍यात आली. आज या महाविद्यालयामध्‍ये कला, वाणिज्‍य तथा कंप्‍यूटर सायन्‍य आदि विविध शाखा सुव्‍यवस्थितपणे चालू आहेत.

      नियोजित: शासनमान्‍य विधी महाविद्यालय लवकरच सुरू करण्‍यासाठी संस्‍थेचे अथक परिश्रम सुरू आहेत. माणगाव खोरे जिल्‍हा यामध्‍ये शिक्षण क्षेत्रामध्‍ये भरारी सुरू आहे.